(रत्नागिरी)
शेतीबाबत नवीन तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना वेळोवेळी लाभणे आवश्यक आहे. मात्र, कृषी विभागामार्फत ही कामे केली जात असतानाच रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. कार्यालयात एकूण ७८४ इतकी पदे मंजूर असून, ३३३ भरलेली असून, ३६१ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यासाठी तांत्रिक पदे ५७५ मंजूर असून, २७६ पदे भरलेली तर २९९ पदे रिक्त आहेत. तांत्रिक पदांमध्ये कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तंत्र अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यासारख्या क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या पदांचा समावेश होतो. या पदांचे अधिकारी/कर्मचारी हे क्षेत्रीय पातळीवर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतात. मात्र, ५२ टक्के पदे रिक्त असल्याने कामावर परिणाम होत आहे.
आतांत्रिक २०९ पदे मंजूर असून, ५७ पदे भरलेली तर १५२ पदे रिक्त आहेत. अतांत्रिक पदांमध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक सहायता अधीक्षक अधीक्षक, सहायक लेखा अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी, लेखा अधिकारी, अनुरेखक, आरेखक, वाहनचालक, नाईक, शिपाई, ट्रिलर ऑपरेटर, रोपमळा मदतनीस, ग्रेड १ मजूर या पदांचा समावेश होतो. परंतु, ७२ टक्के पदे रिक्त असल्याने एका कर्मचान्यावर ४ ते ५ पदाचा ताण पडत आहे.