(नवी दिल्ली)
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका ४ जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. आयओएने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल कुमार यांची निवडणुकीसाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे निवर्तमान अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांचा तीन कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
देशातील प्रमुख महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार तथा भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरोधात जवळपास महिनाभर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर निदर्शने केली. आंदोलक कुस्तीपटूंमध्ये ऑलिम्पिक आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकलेल्या कुस्तीपटूंचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या निमंत्रणावरून आंदोलक कुस्तीपटूंनी गेल्या आठवड्यात क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी निवडणुकीशी संबंधित मागणीही मांडली होती. मावळते अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्याला फेडरेशनमध्ये जागा देण्यात येऊ नये, अशी मागणी कुस्तीपटूंनी केली होती. या भेटीत बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांचा सहभाग होता.