(मुंबई)
भारतातील पदकविजेत्या महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाने जोर पकडला आहे. यावरून आता देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या या कुस्तीपटूंकडं केंद्र सरकारनं दुर्लक्ष केल्यानं आता विविध स्तरांतून त्यांना पाठिंबा मिळत आहे. मात्र, क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू यावर चकार शब्द काढत नसल्यानं ते टीकेच्या रडारवर आले आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू व भारतरत्न सचिन तेंडुलकर याला काँग्रेसनं लक्ष्य केलं आहे.
बॉक्सर विजेंदर सिंह यानं कुस्तीपटूंना पाठिंबा व्यक्त करताना प्रसंगी आपल्या पदकाचाही त्याग करण्याची तयारी दर्शवली आहे. अन्य काही खेळाडूही आता पुढं येऊ लागले आहेत. मात्र, भारतरत्न सचिन तेंडुलकर यानं यावर कुठलीही भूमिका अगर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळं तो टीकेचा धनी झाला आहे.
सचिनच्या मुंबईतील वांद्रे येथील बंगल्यासमोर मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर झळकावून त्याला प्रश्न विचारला आहे. ‘सचिन तेंडुलकरजी, तुम्ही भारतरत्न, माजी खासदार आणि विश्वविख्यात क्रिकेटपटू आहात. मात्र, महिला कुस्तीपटूवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मूग गिळून गप्प आहात. तुमच्याबद्दल लोकांना आदर आहे. तुम्ही पीडित कुस्तीपटूंना मदत करू शकता. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा, असं पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.