(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव आरटीओ ऑफिस शेजारील एका रहिवासी इमारतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये एका माथेफिरुने आंघोळ केली. आंघोळ करताना पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या रहिवाशांनी त्याला धरुन बदडले. या प्रकारानंतर रहिवाशांनी त्या माथेफिरुला पोलिसांच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शवली होती. ही घटना बुधवार 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा घडली. मात्र त्यानंतर ते पिण्याचे पाणी असल्याने लाखो लीटर पाणी उपसण्याची नामुष्की येथील रहिवाशांवर आली.
सविस्तर वृत्त असे की, बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक माथेफिरु कुवारबाव आरटीओ ऑफिस शेजारील एका रहिवासी इमारतीत घुसला. तो टेरेसवर चढला आणि टेरेसवर असलेल्या पाण्याच्या उतरला. पिण्याच्या पाण्यात त्याने मनसोक्त आंघोळ केली. काही जणांच्या घरात गढूळ पाणी येवू लागले. अचानक एवढ गढूळ पाणी आल्याने रहिवाशांनी टाकीकडे जावून पाहिले. यावेळी तो माथेफिरू टाकीतून बाहेर पडताना रहिवाशांनी पाहिला. रहिवाशांनी त्याला धरले. आणि यथेच्छ बदडले.
पिण्याच्या पाण्यात आंघोळ केल्यामुळे येथील सारे रहिवाशी एकत्र जमले. काहींनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचे ठरवले. तर काहींनी आधी पिण्याच्या पाण्याची सोय करा, अशी मागणी केली. या माथेफिरुमुळे घाण झालेले पाणी उपसण्याचे रहिवाशांनी ठरवले. त्यानुसार मशिन आणि पाईपच्या सहाय्याने पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर रात्री उशिरा पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. माथेफिरुमुळे लाखो लीटर पाणी वाया घालवण्याची वेळ रहिवाशांवर आली खरी त्यापेक्षाही त्यांना पिण्याचे पाणी विकत आणण्याची वेळ त्या माथेफिरुने आणली. या प्रकारामुळे रहिवाशी मात्र नाराज झाले होते.