(रत्नागिरी)
मिठाई दुकादाराचा एक व्हायरल झाला होता. या व्हीडीओत मिठाईमध्ये अळी असल्याचे निदर्शनास आले होते. रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासनाच्या हा व्हिडिओ हाती आल्यावर पथकाने कुवारबाव येथील मिठाईच्या दुकानचालकाला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिठाईमधील काजुगरात अळी सापडल्यानंतर पथकाने ही कारवाई केली. तसेच सात दिवसांमध्ये मिठाईच्या दुकानाची स्वच्छता करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सध्या सतर्क आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी मिठाई विकणाऱ्या दुकानदारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार गेले काही दिवस अन्न व औषध प्रशासनाने पथकेही कार्यरत ठेवली आहेत. कुवारबाव येथील एका मिठाई विकणाऱ्या दुकानातील मिठाईमध्ये अळी सापडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेला होता. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिठाई दुकानाची तपासणी केली. त्यावेळी ड्रायफ्रुटच्या बर्फीमधील एका काजुगरामध्ये अळी सापडली.
तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईची कागदोपत्री माहिती उपलब्ध नव्हती. ग्राहकांना बिले दिली जात नव्हती. दुकानातील काही मिठाई कडक झाल्याचे निदर्शनास आले. अस्वच्छताही दिसत होती. तिथे असलेली सुमारे ३ हजार २० रुपयांची मिठाई खराब असल्याचे लक्षात आल्यानंतर ती नष्ट करण्यात आली. तसेच अन्न व औषध प्रशासनाने २० हजार रुपयांचा दंड त्यांना ठोठावला आहे.