(रत्नागिरी)
तालुक्यातील कुरतडे कातळवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. कुरतडे कातळवाडी येथील मंगेश पांडुरंग फुटक यांच्या घराजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती फुटक यांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे पथक पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाल्यावर अवघ्या दोन मिनिटांच्या प्रयत्नातच ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले.
हा बिबट्या सुमारे साडेचार वर्षांचा असून, जातीने मादी असल्याचे वन विभागाने सांगितले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने वैद्यकीय तपासणी करून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचाव पथकात परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, पालीचे वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक प्रभू साबणे, मिताली कुबल, जाकादेवी रेस्क्यू बचाव पथकामध्ये सरपंच सलोनी बंडबे, पोलीस पाटील रमेश आंब्रे, ग्रामीण पोलीस स्थानकाचे मारुती जगताप यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.