(लखनऊ)
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये १४ वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. दीड महिन्यांपूर्वी मुलाला कुत्रा चावला होता. मात्र भीतीमुळे त्याने ही घटना कुटुंबियांना सांगितली नाही. ४५ दिवसांनी त्याला रेबीजची लक्षणे दिसू लागली. मुलाचे वडील त्याला उपचारासाठी अनेक रुग्णालयांमध्ये फिरत होते. परंतु डॉक्टरांनी उपचारासाठी असमर्थता दर्शवली. अखेर सोमवारी अॅम्बुलन्समध्ये वडिलांच्या कुशीत मुलाने तडफडून जीव सोडला.
गाझियाबादच्या चरणसिंह कॉलनीमध्ये शाहवाज (१४ वर्ष) राहत होता. चार दिवसांपूर्वी म्हणजे १ सप्टेंबरपासून शाहवेजला विचित्र त्रास सुरू झाला. पाण्याची त्याला अचानक भीती वाटू लागली. त्याने खाणे-पिणे सोडले होते. भुंकण्यासारखा आवाज तो काढत होता. तो अंधारात राहणे पसंत करू लागला. कुटुंबियांनी शाहवाजला डॉक्टरांकडे नेले. शाहवाजला रेबीज झाल्याचे निदान त्यांनी केले. साबेजचे कुटुंबीय त्याला उपचारांसाठी अनेक रुग्णालयांमध्ये घेऊन गेले. गाझियाबादच्या जिल्हा रुग्णालयात आणि मेरठच्या रुग्णालयांमध्ये शाहवाजला नेण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीच्या जीटीबी आणि एम्समध्येही नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी झाल्याचे व उपचार शक्य नसल्याचे सांगितले. त्याची तब्बेत अधिक गंभीर होऊन ४ सप्टेंबरला शाहवाजचा मृत्यू झाला.
प्राण्याने त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे ‘रेबीज’. हा आजार अत्यंत जीवघेणा असून, वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच, जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे.
प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा ‘रेबीज’ हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची (लकवा) समस्या निर्माण होते. काहीवेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेले दिसून येतात.
तज्ज्ञ म्हणतात, माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रेबीज व्हायरस अत्यंत वेगाने पसरण्यास सुरूवात होते. एकदा रेबीजचं निदान झालं तर या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वांत महत्त्वाचे आहेत.
रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो. रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरतो. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (NCDC) माहितीनुसार, प्राण्यांनी चावल्यामुळे, अंगावर ओरखडे मारल्यामुळे, माणसांच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. भारतात 95 टक्के प्रकरणात माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे. तर, 2 टक्के प्रकरणात मांजर आणि 1 टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मूंगूसामुळे रेबीज परसतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रेबीजची लक्षणं काहीवेळा फार उशीराने लक्षात येतात. पण, तोपर्यंत उपचार कठीण होण्याची शक्यता असते. रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्यापासून ते एक वर्षात लक्षणं दिसू लागतात. तात्काळ उपचार केले नाहीत तर 100 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीव जातो. यामुळे घरातील कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना रेबीजविरोधी लस दिली जाते. त्याचसोबत पशूवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी आणि प्राण्यांसोबत काम करणाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाते.
पण, सामान्यत: आजाराची लक्षणं 2-3 महिन्यातही दिसून येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,
- ताप आणि अंगदुखी होणं
- व्हायरस सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये (चेतासंस्थेत) शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं
- फ्युरिअस रेबीजमध्ये रुग्णाचं वागणं बदलतं. रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते
- हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होणं
- पॅरेलॅटीक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कमकूवत होतात. रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो
रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. कुत्रा किंवा मांजर चावल्यानंतर जखम झालेली जागा तात्काळ साबण आणि पाण्याने धूवून रुग्णालयात जावं. सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, रेबीजवर नियंत्रण हा एकमेव पर्याय आहे
प्राण्याने चावल्यानंतर जखमेवर योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संसर्ग शरीरातील इतर भागात पसरण्यावर नियंत्रण मिळवता येतं. ज्यामुळे पुढील गुंतागुंत कमी होते. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (NCDC) प्राणी चावल्यामुळे झालेली जखम कशी स्वच्छ करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्राणी चावल्यानंतर किंवा प्राण्याने अंगावर ओरखडा मारल्यानंतर तात्काळ डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. प्राण्याने शरीरावर ओरखडा मारला असेल तर रुग्णाला तातडीने रेबीजची लस दिली जाते. पण, जखमेतून रक्त येत असेल किंवा प्राण्यांच्या लाळेशी संपर्क झाला असेल तर लशीसोबत रेबीज इम्युनोग्लोबिन देण्यात येतं.
- प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी.
- पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटं स्वच्छ धूवावा.
- जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अॅन्टिसेप्टिक लावावं.
- साबण किंवा व्हायरसविरोधी पदार्थ (अल्कोहोल, प्रोव्हिडोन आयोडिन) उपलब्ध नसेल तर जखम पाण्याने धूवावी.
- जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी टीटॅनसचं इंजेक्शन घ्यावं.
- कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार द्यावा.
- तात्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी.
प्राणी चावल्यामुळे झालेल्या जखमेवर हे लावू नका
- साध्या हातांनी जखमेला स्पर्श करू नका, स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ करावेत.
- जखमेवर माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर यांसारखे पदार्थ लावू नका.
- जखमेवर पट्टी बांधू नका.
रेबीजबाबत लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव असण्यासोबतच गैरसमजही खूप आहेत.
“रेबीजच्या उपचारात 14 दिवस सलग पोटात इंजेक्शन घ्यावं लागतं किंवा कुत्रा चावल्यानंतर झालेल्या जखमेवर हळद, हायड्रोजन-पेरॉक्साईड, औषधी वनस्पती, तूप लावल्याने संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवता येतं,” असे काही गैरसमज लोकांमध्ये असल्याचं डॉक्टर सांगतात.