(पुणे)
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज दुपारी कोथरुडमध्ये गोळीबार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे. शरद मोहोळची अशाप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शरद मोहोळ याच्यावर कोथरुड येथील सुतारदरा भागात दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराकडून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेनंतर पुणे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात झाली आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली असल्याची चर्चा होती. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला होता. यात स्वाती मोहोळ यांचा देखील सहभाग होता. पुण्यात या प्रसंगावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली होती. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता. येथे पासेस वगैरे नव्हते, त्यामुळे कोण कार्यक्रमाला होते ते माहिती नाही, असे म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.
स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी आहेत. शरद मोहोळ विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, आणि पुणे ग्रामीण परिसरात गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी आहे. कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता.