(राजापूर / प्रतिनिधी)
जमीनी भोवती घातलेल्या कुंपणावरुन पेंडखळे चे सरपंच राजेश हरीचंद्र गुरव वय ५० यांच्यावर कोयतीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान पेंडखळे वठारवाडी येथे घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दत्ताराम महादेव सुर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सरपंच राजेश गुरव यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पेंडखळे गावचे सरपंच राजेश हरीश्चंद्र गुरव यांच्या गावातील वठारवाडी येथील जमिनी भोवती घातलेले कुंपण त्याच वाडीतील दत्ताराम महादेव उर्फ डी.एम. सुर्वे हे तोडीत असतानाच सरपंच राजेश गुरव हे नेमके त्याचवेळी आपल्या बाईकवरुन तेथुन चालले होते. त्यावेळी आपले कुंपण तोडले जात असल्याचे त्यांनी पाहिले आणि बाईक थांबवुन त्यांनी दत्ताराम सुर्वे यांच्याकडे आपले कुंपण का तोडता अशी विचारणा केली. त्यावेळी दोघात वादावादी झाली आणि अचानक दत्ताराम सुर्वे यांनी हातातील कोयतीने सरपंच गुरव यांच्यावर वार केला. त्यामध्ये गुरव यांच्या डाव्या डोळ्याखाली जखम झाली. झालेल्या हल्ल्यात ते बाईकसह खाली कोसळले. त्यानंतर सुर्वे यांनी कोयतीच्या विरुध्द बाजुने गुरव यांच्या खांद्यावर मारहाण केली. या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील सरपंच राजेश गुरव यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्यान्ना रत्नागिरीला हलविण्यात आले.
दरम्यान सरपंच गुरव यांच्यावर हल्ला करणारे दत्ताराम सुर्वे यांच्या विरुध्द भादवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात वापरण्यात आलेली कोयती जप्त केली असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. दरम्यान या दत्ताराम सुर्वे यांच्या पत्नीला धक्काबुकी करण्यात आल्याची तक्रार त्यांच्याकडुन पोलीसांत करण्यात आली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे हेडकॉंस्टेबल के. एस. पाटील अधिक तपास करीत आहेत.