(देवरुख / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद किरदाडी शाळेचा विद्यार्थी सार्थक मकरंद चव्हाण याने “शिक्षक ध्येय” च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय बाल चित्रकार पुरस्कार २०२२ पटकावला आहे. शिक्षक ध्येय च्या वतीने १४ नोव्हेंबरला बाल दिनाच्या औचित्याने राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकलेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १ली ते ५वी आणि ६वी ते १० वी या दोन गटात घेण्यात आली होती.
या स्पर्धेमधे देवरुख जवळील पूर्ण प्राथमिक मराठी शाळा किरदाडी येथील इयत्ता दुसरीत शिकणारा सार्थक मकरंद चव्हाण याने राज्यस्तरीय बाल चित्रकार पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार पटकावणारा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातून सार्थक हा एकमेव विद्यार्थी ठरला.
सार्थक ने यापूर्वी देखील राज्यस्तरावर मंथन परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचे हे यश पाहून त्याचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. सार्थक याचे शिक्षिका सौ.माळवदे, गावचे सरपंच सुबोध पेडणेकर, पोलिस पाटील निलेश पेडणेकर, कला शिक्षक सुरज मोहिते आणि शिक्षक वर्ग यांसह सर्व ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.
इतक्या लहान वयातच सार्थक ने मिळविलेला हा पुरस्कार पाहता त्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.