(खेड / भरत निकम)
शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पक्षाच्या बैठकीत उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी केली आहे. बैठकीत ,’आपण कोणकोणते प्रताप केलेतं ते लोकांना सांगा, त्यानंतर भास्कर जाधव यांनी मदत केली नाही, हे बिनबुडाचे आरोप करायचे, तुम्ही नकोते उपद्व्याप करायचे आणि गळ्याशी आल्यावर दुसऱ्यावर ढकलायचे, हा कुठला प्रकार?’, असा प्रश्नही शिवसेना उबाठा गटाच्या बैठकीत संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला होता.
शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी मोजक्या शिवसैनिकांना बैठकीला बोलावले होते. मात्र उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख यांच्या संदर्भातील चर्चा असल्याने हजारो शिवसैनिक तेथे हजर झाले होते. बैठकीत राजेंद्र आंब्रे, चंद्रकांत चाळके यांच्याबद्दल संतप्त भावना मांडल्या गेल्या. काही जेष्ठ शिवसैनिकांनी, ‘हे गेले ते बरं झालं, आमच्या शिवसेनेचे नाव त्यांनी खराब केलं होतं, पक्षाला डाग लागत लागलेला होता. तो घाणीच्या जाण्याने धुवून निघालाय ‘, अशी संतप्त भावनाही उमटली होती. या दोघांच्या हकालपट्टी नंतर त्यांच्या जागी नवीन नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी केली. दोघांच्या हकालपट्टीचा ठराव केल्यानंतर नवीन नेमणूक करण्यासाठी थेट उध्दव ठाकरे यांना आमदार जाधव यांनी फोन केला. त्यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा प्रमुख पदी सचिन उर्फ पप्पू आंब्रे आणि तालुका प्रमुख पदावर अंकुश काते यांची नेमणूक जाहीर केली.
या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अरुणा आंब्रे, माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, विष्णू आंब्रे, विजय साळूंके, महेश गोवळकर, देवेंद्र मोरे, आप्पा पालांडे, कृष्णा लांबे, अन्वर खान, बशीर हमदुले, राजेंद्र घाग, संतोष उत्तेकर, विजय राक्षे, जयवंत पालांडे, आशिष धाडवे, संदीप कदम, रमेश उत्तेकर, रोहित चाळके आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
चौकश्या कुणी लावल्या? – चंद्रकांत चाळके, राजेंद्र आंब्रे आणि त्याचे सहकारी ही मंडळी केवळ तीन वर्षांपासून भास्कर जाधव यांच्या सोबत आहेत. त्यापूर्वी ते रामदास कदम यांच्यासोबत होते. त्यांच्या सोबत असतानाच या लोकांनी चूकीची कामे केली होती. यानंतर या चूकीच्या कामाची चौकशी कुणी लावली? तो सगळा पूर्व इतिहास आठवा. पोलिस चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागल्यावर तो कुणी लावला? हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया झाली, याचा जाब त्या नेत्याला जाऊन विचारायला हवायं, अशा संतप्त प्रतिक्रिया बैठकीत उमटल्या. त्यानंतर ‘भास्कर जाधव मदत करत नाहीत ‘, असे सांगत सुटलेल्यांनी चूकीच्या कामांमुळे आता पक्ष सोडणार आहेत का? असा खरपूस समाचारही घेतला गेला.
चोऱ्या केल्यानंतर जमिनी लाटल्या?
याच मंडळींनी चोऱ्या केल्या. त्यानंतर जमीनी हडपल्या, आणखीन किती प्रकार केलेले आहेत, या सगळ्याला भास्कर जाधव यांनी सहकार्य काय करायचे होते का? हे जाधवांनी करायला लावलं होतं की त्यापूर्वी केलं होतं, हे लोकांना सांगा, असा गंभीर सवालही शिवसैनिकांनी विचारला आहे. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार आहेत, असे त्यांनी निश्चित केले आहे. या प्रवेशानंतर ‘चूकीची कामे केल्याने ही पापं धुतली जाणार आहेत का?’ स्वच्छ ताठ मानेने तुम्ही जगणार का? अशा संतप्त भावना ही बैठकीत व्यक्त केल्या गेल्या आहेत.