रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे महत्वाचे ठिकाण असलेल्या मारुती मंदिर भागात मारुती मंदिर वरून भाजीमार्केटकडे जाणाऱ्या रोडवर असलेले गटार बाटल्या, प्लास्टिक पिशव्यांनी तुंबलेले आहे. एवढेच नव्हे तर या गटारात किडे पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. एवढे असूनही नगर परिषदेला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही का ? नगर परिषदेचे कर्मचारी नेमकी कोणती सफाई करतात? की फक्त गाडीतून कचरा वाहण्याच काम करतात? असा प्रश्न येथील नागरिकांडून विचारला जात आहे.
मारुतीमंदिर परिसरातील बिल्डिंगमधून येणारे सांडपाणी पाळणा घरासमोर असलेल्या गटारातून समोर कोहिनूर सोसायटीच्या गटारातुन जाते. मात्र पाळणाघर जवळचे हे गटार 2-3 दिवस तुंबलेले आहे. गटारामध्ये प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, पिशव्या आणि अन्नपदार्थ साचल्याने किडे पडलेले आहेत. पाणी वाहण्यासाठी टाकण्यात आलेली मोरी छोटी असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी या उघड्या गटाराचे सांडपाणी तुंबून मोरीच्या वरपर्यंत येत आहे. अशीच स्थिती राहिली तर किडे, प्लास्टिक पिशव्या वर येऊन हे सांडपाणी रस्त्यावर वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न उदभवतो. या परिसरात महत्वाचा बाजार असल्याने स्थानिकांसह जाणा-येणारे नागरीक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.
सध्या मारुती मंदीर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर स्पर्धा चालू आहेत. या स्पर्धेसाठी आलेले खेळाडू, प्रेक्षक खाऊ खाल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात घाण व कचरा टाकतात. याचाही आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
नगर परिषदेने हे उघडे गटार बंदिस्त करावे. त्याचप्रमाणे पाळणाघर इथपासून भाजी मार्केट पर्यत मोठ्या मोऱ्या टाकाव्यात. जेणेकरून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होऊन आरोग्याचा प्रश्न उदभवणार नाही. याकडे वेळीच लक्ष घालून नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.