(रत्नागिरी)
तालुक्यातील कासारवेली-साखरतर येथील बँक ऑफ महाराष्ट्रा समोरील रस्त्यावरील गटाराचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ठेकेदाराने माती व खडी तशीच रस्त्यावर ठेवल्याने दुचाकी घसरून अपघात झाला, यात दुचाकीस्वार जखमी झाला असून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यासह ठेकेदारावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ठेकेदार खान व अधिकारी पवल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे दोघे संशयित आहेत. ही घटना शनिवारी (ता. ११) सकाळी साडेदहाच्या सुमारास कासारवेली-साखरतर येथील बँक ऑफ महाराष्ट्रासमोरील रस्त्यावर घडली. फिर्यादी माजी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास लक्ष्ण भोसले (रा. खोपटकरवाडी, बसणी, ता. रत्नागिरी) हे दुचाकीने (एमएच ०८ एडब्ल्यू ६८०६) बसणी ते रत्नागिरी असे जात असताना संशयित खान यांनी गटाराचे काम पूर्ण झालेले असतानाही पडलेली माती-खडी न काढल्यामुळे भोसले यांची दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले. तसेच दुचाकीचे नुकसान झाले.
या प्रकरणी भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यासह ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.