(नवी दिल्ली)
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा काल सेवानिवृत्त झाले. यापूर्वी त्यांनी ५ महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी केली. विशेष म्हणजे त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणींचे थेट लाईव्ह प्रसारण करण्यात आले. सरन्यायाधीश म्हणून १६ महिन्यांच्या कालावधीत त्यांची कारकीर्द चांगली गाजली. शेवटच्या दिवसापर्यंत ते न्यायालयीन प्रक्रियेत राहिले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत राहिले आणि अनेक महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी घेतली.
अखेरच्या दोन दिवसांत काल कर्नाटक कोळसा खाण, कर्नाटकातील बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमाकुरू जिल्ह्यांतील खाण कंपन्यांसाठी लोह खनिज उत्खनन मर्यादेत वाढ केली. तसेच निवडणुकीतील मोफत आश्वासनांचे प्रकरण ३ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केले.
दरम्यान, अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी रमणा यांच्या निवृत्तीबद्दल बोलताना तुमच्या निवृत्तीमुळे आम्ही एक विचारवंत आणि उत्कृष्ट न्यायाधीश गमावत आहोत. त्याचवेळी ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांना कोर्टातच रडू कोसळले. सरन्यायाधीश रमणांना ते म्हणाले की, तुम्ही लोकांचे न्यायाधीश आहात. त्यावेळी रमणादेखील भावूक झाले.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या कार्यकाळाचा काल शेवटचा दिवस होता. यानिमित्त शुक्रवारी एन. व्ही. रमणा यांनी कार्यपीठाला संबोधित केले. १६ महिन्यांत मी केवळ ५० दिवस प्रभावी आणि पूर्णवेळ सुनावणी करू शकलो, असे म्हटले.