(गाझियाबाद)
दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या डासना कारागृहातील तब्बल 140 कैद्यांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या बातमीने खळबळ उडाली आहे. 5500 कैद्यांची यावेळी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 140 कैद्यांचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
अधीक्षक आलोक कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सुईद्वारे नशा करणा-यांना एचआयव्हीची लागण होण्याचा धोका अधिक असतो. एचआयव्ही आजार जीवघेणा ठरू शकतो. तो वेगाने लोकांमध्ये पसरण्याचाही धोका आहे, परंतु कारागृह अधीक्षकांनी, 140 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येणे फार मोठी गोष्ट नाही असे अचंबित करणारे विधान केले आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांची काळजी घेऊन त्यांना इतर रुग्णांपासून वेगळे केले जाते, असा दावा कारागृह अधीक्षकांनी केला आहे.
बाधित कैद्यांना एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर इतक्या कैद्यांना संसर्ग कसा झाला याचा तपास करण्यात आरोग्य पथक करत आहे.