(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कारवांचीवाडी येथील स्टॉपच्या पुढच्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली प्लास्टीक कचर्याचा ढीग साचला आहे. या कचर्याच्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत.
या ठिकाणी नागरिकांकडूनच कचरा टाकण्यात येत आहे. तसेच उनाड गुरे व भटकी कुत्रे येथील कुजके अन्न पदार्थ खात असल्याने त्यांना विषबाधा होण्याची शक्यता आहे. 2-3 महिन्यापूर्वी रत्नागिरीत प्लास्टीक व कुजलेले अन्न खाल्याने गायीचा मृत्यू झाला होता. कुत्री आणि गुरांमुळे येथील कचराही इतरत्र पसरलेला दिसून येत आहे. त्यामुळे स्टॉपवर येणाऱ्या प्रवासी व वाहनधारकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांचीही जबाबदारी
बर्याच वेळी घरातील प्लास्टीक, नासलेले पदार्थ नागरिक रस्त्यावर टाकतात. तसे न करता एक सुज्ञ नागरिक या नात्याने कचराकुंडीत किंवा घंटागाडीवर देणे गरजेचे आहे. हे आमचे काम नाही, ग्रामपंचायत, नगर परिषद, संबधित यंत्रणा यासाठी आहेत असे म्हणून आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. आरोग्याचे प्रश्न उद्भवू नयेत यासाठी प्रत्येकाने जबाबदारपणे वागून संबंधित यंत्रणेला सहकार्य करणे तितकेच गरजेचे आहे. तरच ‘स्वच्छ रत्नागिरी सुुंदर रत्नागिरी’ चा उद्देश सफल होईल.