(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वेतून उतरल्यानंतर गावी जाण्यासाठी बसची वाट पाहणार्या प्रवाशांना कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्यात आले. याबाबतची फिर्याद निरुळ तेलीवाडी येथील सुरेश रसाळ (65) यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात दिली होती. पोलिसांनी दोघांना सांगली येथून ताब्यात घेतले आहे. तर दोघेजण अद्याप फरार आहेत. मोहंमद आसिफ आरिफ अन्सारी (35, म्हेसाना, गुजरात), रफिक अन्सारी (42, उस्मानाबाद, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र हे दोघे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडून दीड लाखाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली. तर फरार झालेले इम्रान व शादाब अशा दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रसाळ हे 18 ऑक्टोबर रोजी पत्नीसह मुंबईतून रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आले. यावेळी आसिफ आणि रफीक यांनी आपण कुठे जाणार अशी विचारणा केली. रसाळ यांनी पावस निरुळ येथे जाणार असल्याचे सांगितले. त्यावर चौघांनी आम्ही तुम्हाला पावस एसटी स्टॅण्ड पर्यंत सोडू असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रसाळ हे पत्नीसह टाटा सफारी कारमध्ये बसले. मात्र कारमध्ये अन्य दोन संशयित शादाब, इम्रान आधीपासून बसलेले होते. रसाळ यांनी आपल्या बॅग गाडीच्या मागच्या सीटवर ठेवल्या. सकाळी 7 वा. च्या सुमारास गाडी पावस स्टॅण्डजवळ आली असता रसाळ व त्यांची पत्नी कारमधून उतरले. यावेळी त्यांनी बॅगेची तपासणी केली असता 1 लाख 20 हजार रुपयांचा सोन्याचा हार, 40 हजार रुपये किंमतीची चेन, अंगठी, सोन्याची बांगडी व 50 हजार रुपये रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले.
रसाळ यांनी तत्काळ पूर्णगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञातांविरोधात भादविकलम 379, 34 नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस घटनेचा तपास करत होते. दरम्यान सांगली येथे दोन चोरटयांना अटक करण्यात आल्याची माहिती पूर्णगड पोलिसांना मिळाली होती. पूर्णगड पोलिसांनी सांगलीतील पोलिसांशी संपर्क साधला.
रत्नागिरीतील चोरीशी त्या दोघांचा संबंध आहे का? याची चौकशी केली. सांगली पोलिसांनी दोन्ही संशयितांकडे रत्नागिरी चोरी विषयी चौकशी केली असता पोलीस खाक्या दाखवताच दोघांनी कबुल केले. रत्नागिरी येथील चोरीही आम्हीच केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. मात्र अन्य दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.