संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना घडली आहे. उडत्या पतंगाच्या नायलॉनचा मांजा दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकून गळा चिरल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडीत घडली आहे. नुकतीच नागपुरात ११ वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळच्या सुमारास भिवंडीतही एकाचा नायलॉन मांजाने जीव घेतला आहे. ही घटना भिवंडीमधील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाण पुलावर घडली. संजय हजारे (४७ रा. उल्हासनगर) असे मृताचे नाव आहे.
संजय हजारे उल्हासनगरमध्ये राहत होते. काल मकरसंक्रातीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस कामावरून सुटून ते भिवंडीतून घराच्या दिशेने उड्डाण पुलावरून दुचाकीने निघाले होते. याच दरम्यान एका उडत्या पतंगाच्या मांजा अचानक त्यांच्या गळ्याला अडकला व काही कळायच्या आत मांजाने त्यांचा गळा चिरला गेला. यानंतर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भिवंडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मकर संक्रातीच्या दिवशीच हजारे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.
चायना मेड नायलॉन मांज्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे चायना मांज्यावर बंदी असताना सुद्धा सरकारने मांजा विक्रीच्या बंदीसाठी परिणामकारक उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. यामुळे राज्यात एकाच दिवशी नायलॉन मांजामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे.
या मांजाने नागपुरातही एका बालकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेद साहू असे मृत बालकाचे नाव आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृत वेद शनिवारी सायंकाळी वडिलांबरोबर दुचाकीवरून जात असताना अचानक रस्त्यात नॉयलॉन मांजा आला व त्याचा गळा कापला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जवळच्या मानकापूर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने रात्रीच त्याला धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारास विलंब झाल्याने अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. मकरसंक्रांतीच्या दिवशीच हसत्या-खेळत्या वेदच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.