(मुंबई)
वाईनची विक्री सुपर मार्केटमध्ये करण्यास परवानगी देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय वादात सापडला असताना आता देशी दारूला प्रोत्साहन देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बुधवारी, २० एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काजूबोंडे, मोहाच्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
काजू आणि मोहाची फुले यांच्यापासून बनणाऱ्या दारूला याआधी देशी दारूचा दर्जा देण्यात आला होता. मात्र जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारूच्या दुकानात मिळणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही ६०० कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल, असा राज्य सरकारचा मानस मानस आहे. तसेच काजूबोंडे, मोहाफुले यापासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात काजू बोंडे मोठ्या प्रमाणवर वाया जातात. त्यांचेवर योग्य प्रक्रिया करण्याचे ज्ञान स्थानिकांना नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र आता यापासून निर्माण होणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा मिळत असल्यास त्यावर प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल असे जाणकारांचे मत आहे.