(चिपळूण )
चिपळुणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि कॉंग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे चार व शिवसेना ठाकरे गटाच्या दोन महिला माजी नगरसेविका अशा एकूण सहा माजी नगरसेवकांनी मंगळवारी (दि. १४) रात्री मुबई येथे ना. एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर प्रभावित होऊन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ना. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करताना माझ्यावर जो विश्वास दाखविलात तो सार्थ ठरवू, चिपळूणच्या विकासाला गती देऊ, अशी ग्वाही दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, करामत मिठागरी, हारून घारे, संजिवनी शिगवण, शिवसेनेच्या माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, संजीवनी घेवडेकर आदींनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आ. गोगेश कदम यांचे खंदे समर्थक उद्योजक आणि सामाजिता कार्य श्री. नासिरभाई खोत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुधीर शिंदे, करामत मिठागरी, हारून घारे, माजी नगरसेविका संजिवनी शिगवण, शिवसेनेच्या माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, संजिवनी घेवडेकर आदींनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली होती. त्यावेळी आपण ही भेट चिपळूण शहराच्या विकासासाठी घेतली, असे त्यांनी सांगितले होते. तेव्हापासून हे माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. काही दिवसांनी या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिंदे गटात प्रवेशासाठी वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याने अखेर मंगळवारी (दि. १४) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी आमदार योगेश कदम यांनी चिपळूणवासियांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुराची समस्या सोडविण्यासाठी नदीतील गाळ काढण्याकरिता भरघोस निधी देण्याचे जाहीर केले. तसेच निळ्या व लाल पूररेषेबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी सुधीर शिंदे यांनी चिपळुणात मोठ्या संख्येने शिंदे गटात इनकमिंग सुरु होईल असे सांगितले. या प्रसंगी मुरादपूर, मिठागरी मोहल्ला येथील मुस्लिम बांधवांनी एकमुखी निर्णय घेत शिंदे गटात प्रवेश केला.