(रत्नागिरी)
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढाव घेत, असमाधानकारक काम करणाऱ्यांना ‘डच्चू’ देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसनेही पक्षात फेरबदल सुरु केले असून, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या अशोक जाधव यांना काम असमाधानकारक असल्याने पदावरुन पायउतार केले आहे.
लोकसभा निवडणुका चार-पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यानंतर विधानसभा किंवा त्याआधी नगर पालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजांचा आढावा घेत, नवनव्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पदावर असणाऱ्या कार्यकर्त्यांचाही लेखाजोखा मांडला जात आहे.
राज्यातील राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर काँग्रेसनेही पक्षाची घडी मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेस पक्षासह विविध कमिट्यांचाही प्रदेश पातळीवरुन आढावा घेतला जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटींतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी गतवर्षी २५ जुलै २०२२मध्ये अशोक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर जिल्हयात पक्षाचे काम वाढवणे, जिल्हा तालुकास्तरावर कमिट्या नेमणे अपेक्षित होते. मात्र या कमिट्या तयार करुन त्या प्रदेश पातळीवर पाठवलेल्या नाहीत आणि कामाचा आढावा दिला गेला नाही. प्रदेशच्या बैठकांनाही अनेकवेळा अनुपस्थित राहिल्याने, प्रदेश कार्यालयाकडून कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करण्यात आले.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात पक्षाचे काम जोमाने होणे आवश्यक असल्याने अशोक जाधव यांना सामाजिक न्याय विभागाच्य जिल्हाध्यक्ष पदावरुन पद मुक्त करण्यात आल्याचे पत्र काँग्रेसचे प्रदेश कमिटीमधील सरचिटणीस प्रमोद मोडे यांनी पाठवले आहे.