(खेड)
कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कशेडी बोगद्याची एक मार्गिका सुरू करण्यात आली. आता शनिवारपासून मुंबईकडे जाणाऱ्या लहान वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन ही मार्गिका परतीच्या प्रवासासाठी सुरू करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातील चाकरमान्यांकडून होत आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होते. यामध्ये असलेल्या कशेडी घाटातून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. अशातच यावर्षी महामार्गाचे एक मार्गिका पूर्ण करतानाच चौपदरीकरणात नव्याने करण्यात आलेल्या कशेडी बोगद्यातील एक मार्गिका मुंबईकडून तळकोकणात येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कशेडी घाटातील वाहतुकीवरील ताण काहीसा कमी होऊन दोन्ही मार्गानी / वाहतूक सुरू राहिल्याने वाहतूक कोंडीतून काहीशी मुक्तता झाली.
कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू होणार आहे. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी कशेडी बोगद्यातून मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू करावी अशी आग्रही मागणी चाकरमान्यांकडून केली जात आहे.