(खेड / भरत निकम)
महामार्गावरील कशेडी घाटात केमिकलचा टॅंकर २०० फूट खोल दरीत कोसळला आहे. टॅंकरचे तुकडे झाले असून चालक जागीच ठार झाला. जीवनलाल बारी (वय ३३, रा. मध्यप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात मुंबईतून गोव्याकडे जाणारा टॅंकर (क्र. एमएच ०४ सीजी ७९६२) केमिकल ने भरला होता. कशेडी घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर रस्त्याच्या उजव्या बाजूला गेला आणि जवळपास २०० ते अडीचशे फूट खोल दरीत कोसळला. संपूर्ण टॅंकरचे तुकडे झाले असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर माहिती मिळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले होते.