(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी पंचशील नगर बुद्धविहार येथे मुंबई शाखेचे ऑडिटर अनंत विठ्ठल पवार यांनी देणगी दिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना आयु. प्रकाश भागुराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी रत्नागिरी तालुका बौध्दजन पंचायत समितीचे उपक्रमशील अध्यक्ष आयु. प्रकाश रामचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
या प्रसंगी विचारमंचावर मुंबई शाखेचे अध्यक्ष मा. विजय पवार, खजिनदार मिलिंद पवार, माजी सभापती अनिल पवार गुरूजी, महेंद्र तथा अप्पा पवार, सेक्रेटरी संजय पवार, महिला मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या शुभांगी पवार, सेक्रेटरी नलिनी पवार, अश्विनी पवार यांच्या समवेत संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी संजय पवार यांनी केले. त्यानंतर देणगीदार अनंत पवार (मुंबई) यांनी देणगी दिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शाखेचे अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बौद्धाचार्या सौ. प्रिशा प्रशांत पवार, संघमित्रा दिनेश पवार यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक पूजापाठ घेण्यात आला. याप्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सल्लागार व पत्रकार किशोर पवार, अनिल पवार, प्रकाश रामचंद्र पवार, अध्यक्ष प्रकाश भागुराम पवार यांनी देणगीदार अनंत विठ्ठल पवार (मुंबई) यांचे विशेष आभार मानले व बौध्दजन पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती दिली.
देणगीदार अनंत पवार यांचा बौध्दजन पंचायत समितीच्या वतीने शाल व बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले व गोड खाऊ वाटप करण्यात आला.