(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कळंबस्ते गावात बिबट्याचा वावर भरवस्तीत वाढत असल्याने चित्र आहे. या बिबट्याचे ग्रामस्थांना रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. मात्र वनविभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. बलदंड बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जिल्ह्यात बिबट्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असुन निसर्ग सवंधर्नाच्या नावाखाली वनविभागाकडुन कायद्याचे पालन करण्यात येत आहे. परंतू बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आता मानवाला दहशतीखाली जगावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कळंबस्ते, कसबा आदी गावामध्ये बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. हा बिबट्या सहा ते सात दिवसांपूर्वी कळंबस्ते मोहलल्यातील दर्ग्याजवळ रात्रीच्या सुमारास ग्रामस्थांना दिसून आला. वस्तीत येणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात देखील कैद झाला आहे. दृश्यात दिसत असणारा बलदंड बिबट्या शिकार करण्याच्या हेतूने वस्तीत येत असल्याचे दिसुन येत आहे.
तसेच कसबा देवपाट येथील रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास गेले अनेक दिवस सतत बिबट्यासह दोन बछड्यांचे दर्शन दुचाकीस्वार व ग्रामस्थांना होत असल्याचे स्वतः ग्रामस्थ चर्चेतून सांगत असतात. या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी धाडसी युवक मझर काझी यांनी केली आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याचे वनविभागासमोर आव्हान
रत्नागिरीच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस बिबटे भर वस्तीत दिसून येत आहेत. मात्र या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी बघितलेला बिबट्या हा पुर्णपणे प्रौढ झालेला आहे. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावणे गरजेचे आहे. पण वनविभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. मात्र एखाद्या भागात बिबट्या दिसल्यावर त्या भागात वन अधिकारी दाखल होऊन बिबट्यापासून संरक्षण कसे करावे याचे धडे ग्रामस्थांना देतात. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांकडून ट्रॅप कॅमेरे, पिंजरे लावले जात नाहीत. या बलदंड बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.