सौ. तेजा मुळ्ये, रत्नागिरी
हे गीत सर्वांचं फार मनाजवळचं असणारं, अर्थातच स्वर्गीय स्वरालंकार लाभलेल्या लता बाईंचं गीत म्हणून ते प्रसिद्ध असल्याने त्यातील भावविष्कार हे त्यांचेच वाटतात.
परन्तु कवी पी सावळाराम यांनी शब्दरचना करताना फक्त मा. दीनानाथ यांनाच डोळ्यासमोर ठेवलं असेल अस नाही,कोणत्याही कवीचा नेहमीच विश्वव्यापक विचार करण्याकडे कल असतो आणि म्हणूनच त्याची कविता ही मनामनांपर्यंत पोहोचते.
जे पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व्यक्तिमत्व घडवण्याचे कष्ट घेतात, मेहनत घेतात ,,,,म्हणजेच कल्पवृक्ष लावणे अशी कल्पना आहे, ज्यायोगे मुलांची आयुष्य समृद्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे अशा या उज्वल भविष्यकाळासाठी भौतिक आणि भावनिक कल्पवृक्ष ठरतात. कल्पवृक्ष म्हणजे इच्छित फळ देणारे झाड. चांगली निगराणी केलेल्या झाडाला फळं चांगली येतील पण तोपर्यंत त्यांची निगराणी करणाऱ्याचे आयुष्य खर्ची पडतेआणि प्रत्यक्षात मुलांचे आयुष्य जगणे सुरू झाले की अनुभवाने कष्टकरी पालकांचे महत्व मुलांना वाटू लागते.
पण आयुष्य घडू लागते आणि यशस्वी होण्याची वेळ येते तेव्हा अंतरलेल्या पालकांची कमतरता जाणवू लागते मग असे विचार मनात येऊ लागतात की, रोज दिसणारे चंद्र तारे यांच्या माध्यमाने आपले देवाघरी असणारे पालक आपल्याला पहात आहेत. त्यांना आपल्याला यशस्वी होताना पाहून धन्य वाटत असेल. ते आपल्याला पाहून तिथूनच आशीर्वाद देत असतील पण आपल्यासाठी मनाला भावणारी वात्सल्य भावना, कृतार्थ भाव पाठीवर कौतुकाने हात फिरवावा, शाब्बासकी देऊन त्यांचा समाधानी चेहरा एकदातरी पहायला मिळावा अशी अंतरमनाने साद घालावी वाटते,,,,,आणि नकळत डोळे भरून येतात.
ही भावना सर्वच व्यक्तींना भावणारी, हवीशी वाटणारी आणि मुख्य म्हणजे स्वतःची वाटणारी आहे त्यामुळे हे गाणं कानी पडतं तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपापल्या भावाने अंतर्मुख होतो आणि भाऊक मनाने कानावर गीताचे पडणारे शब्द आणि सूर डोळ्यात आसवे आणतात. दोन पिढ्यांचे आयुष्याचे सार या सात आठ ओळीत आणि सप्तसुरांच्या सुरावटीने व्यापले आहे. कवीची शब्दरचना आणि संगीत योजना तसेच सुरावट या सर्वांची परिणामकारकता म्हणून वर्षानुवर्षे अशी गाणी आपण कान देऊन ऐकतो.