(रत्नागिरी)
ज्येष्ठ संगीतकार सौ. वर्षा भावे संचालित कलांगण- मुंबई आणि स्वराभिषेक – रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवारी (ता. १९) विशेष शास्त्रीय मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई आणि रत्नागिरीतील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व व विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण होण्यासाठी स्वराभिषेक आणि कलांगण या दोन संस्थांतर्फे मुंबई आणि रत्नागिरी येथे एकत्रित मैफिलीचे आयोजन दर तीन महिन्यांनी केले जाते. थिबा पॅलेस जवळील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर आज सायंकाळी साडेसहा वाजता ही महफिल होणार आहे. यावेळी अथर्व कंठी, सौम्या क्षीरसागर (मुंबई), मीरा सोवनी ऋग्वेदा हळबे (रत्नागिरी) हे विद्यार्थी शास्त्रीय गायन करणार आहेत. त्यांना महेश दामले, तन्वी मोरे संवादिनीसाथ, तर केदार लिंगायत व राजू धाक्रस हे तबलासाथ करणार आहेत. यावेळच्या मैफिलीला वर्षा भावे उपस्थित राहणार आहेत.
ही मैफल विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वराभिषेकच्या संचालिका सौ. विनया परब यांनी केले आहे.