(रत्नागिरी)
येथील रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार रत्नागिरीतील खो-खोपटू सायली दिलीप कर्लेकरला जाहीर झाला आहे. तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक खो-खो स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले आहे. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीदिनी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शालेय ते कनिष्ठ महाविद्यालयीन राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीला गेली ५ वर्षे राणी लक्ष्मीबाई पुरस्कार कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे दिला जात आहे. या पुरस्कार वितरणाची तारीख वेळ लवकरच कळवण्यात येईल, असे माधव हिर्लेकर यांनी सांगितले.
सायली कर्लेकर हिची रा. भा. शिर्के प्रशालेत इयत्ता आठवीत शिकताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. हिमाचल ऊना येथे झालेल्या खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत तिने यश प्राप्त केले. तिने या खेळाची सुरवात इयत्ता पाचवीपासून केली. या खेळाचा सराव छत्रपती शिवाजी स्टेडियमवर नियमितपणे करते. शाळेचे क्रीडा शिक्षक विनोद मयेकर, राष्ट्रीय खो-खोपटू पंकज चवंडे हे तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आहेत. गेल्या चार वर्षांपासून सायली कर्लेकर खो-खो हा खेळ शिकत आहेत. या कालावधीत तिने अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. तिला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.