(रत्नागिरी)
रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाच्या सन 2021 सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवारी सायंकाळी संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांच्या हस्ते थाटात करण्यात आले.
व्यासपीठावर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह संदीप कळके उपस्थित होते. यावेळी पुरस्कार वितरणासह प्रमुख देणगीदारांचे सत्कार करण्यात आले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सुहास ठाकुरदेसाई, मानस देसाई आदींनी करून दिला.
याप्रसंगी उदय गोविलकर म्हणाले की, समाजातील चांगल्या कामाची दखल घेऊन आणि कोणतेही अर्ज, फाईल न मागता रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ पुरस्कार देत आहे. ही एक उत्कृष्ट परंपरा संघाने निर्माण केली आहे. ज्यांचा सत्कार झाला ते गुणी आहेत. यामुळे सत्काराची उंची वाढली, ज्या नावाचा सत्कार घेतो, त्याचा सन्मान यानिमित्ताने झाला आहे. समाजात गुणीजनांमध्ये वाढ होण्यासाठी हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत. ब्राह्मण व समस्त हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे. समाजाला ज्ञान देणे, यज्ञकर्म करणे व करवून घेणे हे ब्राह्मणांचे काम आहे. आपण आपल्या मुलांना स्नानसंध्या, सत्यनारायण, गणपतीची पूजा शिकवली पाहिजे. पौरोहित्यामध्ये नवीन पिढी येत आहे. शेतकरी, पौरोहित्य करणाऱ्यांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत, याची समाजानेही दखल घेतली पाहिजे. विवाह जमण्यावरून समस्या पाहायला मिळतात. यावर मार्ग निघाला पाहिजे. ब्राह्मण माणूस स्वतःच्या पायावर हिमतीवर उभा राहतो. तो भीक मागत नाही.
सत्कारमूर्तींनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे आभार मानताना कोणत्याही अर्ज, फाईलशिवाय चांगल्या कामाबद्दल पुरस्कार दिला जातो, हे विशेष आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे आता आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. समाजात चांगले काम वाढण्यासाठी संघाला आम्ही मदत करू, असेही सांगितले. सौ. रेणुका मांदुस्कर यांनी सूत्रसंचालन केले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी आभार मानले.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा गौरव (पुरस्काराचे स्वरूप- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, पुस्तक भेट आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ)
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार- आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू ईशा पवार हिच्या वतीने आई सौ. कंचन पवार यांनी पुरस्कार स्वीकारला.
धन्वंतरी पुरस्कार- डॉ. मोहन किरकिरे ज्येष्ठ पत्रकार
दर्पण पुरस्कार- संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर
आदर्श पौरोहित्य पुरस्कार- वेदमूर्ती नारायण जोगळेकर
आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार- प्रसाद काकिर्डे
आदर्श कीर्तनकार पुरस्कार- महेश सरदेसाई
उद्योजिका पुरस्कार- सौ. पूर्वा प्रभुदेसाई
उद्योगिनी पुरस्कार- सौ. सीमा आठल्ये