(मुंबई)
बेळगाव हिरे-बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांची कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून नासधूस करण्यात आली. यावेळी गाड्यांच्या नंबर प्लेटवर लाथा मारल्याचे व महाराष्ट्राविरोधी घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. कर्नाटकच्या या कृतीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता सीमावादाच्या या लढ्यात उडी घातली आहे. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. मात्र महाराष्ट्राच्या संयमाचाही अंत होऊ शकतो. जर येत्या ४८ तासांत हिंसाचार न थांबल्यास माझ्यासह सर्वांना बेळगावात जाऊन तेथील लोकांना धीर द्यावा लागेल, असा अल्टिमेटम कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत शरद पवारांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कर्नाटक बरोबरच्या सीमावादासंदर्भातील सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकाने हा सर्व प्रकार थांबवायला हवा. क्रियेला प्रतिक्रिया येतेच. मात्र, असे प्रकार योग्य नाहीत. महाराष्ट्राने संयम दाखवला आहे. जे कुणी वाहने रोखण्यासारखा प्रकार करतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोललो आहे. या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.