(राजापूर/ प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील आडवली परिसरात अवैध आणि विनापरवाना जिलेटीन व अन्य साहित्याचा वापर करून सुरूंग स्फोट घडवण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. याठिकाणी अवैध व विनापरवाना क्वारी सुरू असून प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याच्या या परिसरातील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. दरम्यान गतसप्ताहात गुरूवारी दोन जून रोजी याच ठिकाणी एक ट्रॅक्टर उलटून जयराम रामसिंग जाधव वय ५५ या कर्नाटकातील इसमाचा मृत्यू झाला होता व तो या विनापरवाना क्वारी उत्खनन करून परतत असताना दगड कोसळून झाल्याची चर्चा होत आहे.
मात्र या गरीब मजूराच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी करून तपास करण्याऐवजी पोलीसांनी संबंधित ठेकेदाराच्या दबावाला बळी पडून हे प्रकरण तडजोडीने मिटवल्याची चर्चा सुरू आहे. राजापूर तालुक्यात अशा प्रकारे आडवली परिसरात गेली तीन वर्षे एका सत्ताधारी राजकिय पक्षाशी संबंधित असलेल्या ठेकेदार पुढाऱ्याकडून बेकायदेशीरपणे उत्खनन केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या ठिकाणी विनापरवाना क्वारी चालविली जात असून काळया दगडाच्या उत्खननासाठी जिलेटीन व अन्य साहित्याचा राजरोसपणे वापर केला जात आहे. कर्नाटकातील मजूराच्या अपघाती मृत्यूनंतर आता या प्रकरणाची चर्चा तालुक्यात सुरू आहे. या अपघातातील ट्रॅक्टर चालक रामेश्वरलाल गाडरी हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अद्यापही कोल्हापूरला उपचार सुरू आहेत.
आडवली भागात रस्त्याचे काम सुरु असून याठिकाणी मोठया प्रमाणावर दगडमातीचे उत्खनन केले जात आहे. हे उत्खनन बेकायदेशीरपणे व विनापरवाना सुरू आहे. या ठिकाणी काळ्या दगडाच्या उत्खननासाठी जिलेटीन व अन्य साहित्याचा वापर केला जात आहे. गेली दोन ते तीन वर्षे अशा प्रकारे या ठिकाणी एका ठेकेदाराकडून हे उत्खनन केले जात आहे. गुरुवारी याठिकाणी अपघात होऊन एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर आता हा प्रकार पुढे आला आहे. सुरूंग स्फोटाच्या उत्खननातील दगड कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे. मात्र त्याबाबत पोलिस प्रशासन सुस्तच आहे.
या घटनेनंतर या ठिकाणी काम करणाऱ्या मुकादमाने दिलेल्या तक्रारीतही अशा प्रकारे दगड कोसळून सदर इसमाचा मृत्यू झाल्याचे दिलेल्या खबरीत नमूद केले होते. मात्र त्यानंतर संबंधित ठेकेदाराने पोलीसांसोबत चर्चा करून हे प्रकरण मिटविल्याचे बोलले जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना काही रक्कम देऊन ठेकेदाराने हे प्रकरण मिटविले असल्याची चर्चा आहे. तर पोलीसांनीही आकस्मिक मृत्यूची नोंद करत फाईल बंद केली आहे.
असे जरी असले तरी याठिकाणी जिलेटीनसारख्या साहित्याचा वापर करून होत असलेल्या बेकायदेशीर उत्खननाचे काय ? अशा प्रकारे भविष्यात आणखी बळी गेले तर त्याला जबबादार कोण ? पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन याबाबत गांभीर्याने विचार करणार आहे की नाही? असे सवाल आता तालुक्यातून उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, बेकायदा उत्खनन प्रकरणी कारवाई झाली पाहिजे आणि गरीब मजूराचा मृत्यू नेमका कसा झाला याचाही पोलीसांनी शोध घेतला पाहिजे अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांत होत आहे.