(खेड-संगलट / वार्ताहर)
बोगस पतपेढीच्या आडून कर्ज देण्याचे आमिष दाखवून मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यात अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील आरोपी भालचंद्र पालव (३१), रोहित नागवेकर (३७) या दोघांना मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा ४ च्या पथकाने नवी मुंबईतील बेलापूर, उलवे परिसरात पहाटे बेड्या ठोकल्या. हे आरोपी हाती लागल्याने ठाणे, मुंबई व पुण्यातील अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
आकृती व ग्लोबल फायनान्ससह पालघर जिल्ह्यातील डहाणू बोगस “विजयदीप पतपेढी”ची पॅफ्लेट वृत्तपत्रांमध्ये टाकून घरोघरी पाठवले जात होते. सदर पॅफ्लेटद्वारे नागरिकांना लोनचे आमिष दाखवले जात होते. या आमिषाला वडाळा, नेहरूनगर परिसरातील दोन
व्यक्ती बळी पडले. वडाळा परिसरातील व्यक्तीने २० लाख रुपयांचे लोन घेण्यासाठी पॅफ्लेटवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. लोनच्या प्रोसेसिंगसह अन्य कारणांस्तवर त्या व्यक्तीकडून ६ लाख १३ हजार १ रुपये घेण्यात आले. पैसे देऊनही त्या व्यक्तीला लोन मिळाले नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात तक्रार केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ४ चे पथक करू लागले. तपासादरम्यान आरोपी नवी मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना चौकशी केली समजली. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना, उपायुक्त बालसिंग राजपूत, एसीपी दत्तात्रय नाळे, पोनि इंद्रजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजय बिराजदार, सपोउपनि तुकाराम सावंत, अंमलदार प्रमोद मोरे, सुशील साळुंखे, प्रवीण चौरे, लखन चव्हाण यांनी सापळा लावून आरोपी भालचंद्र पालव याच्या मुसक्या आवळल्या.
रेकॉर्डवरील गभीर गुन्ह्यातील आरोपी
लोनचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणारे आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी भालचंद्र पालव याच्या विरुद्ध ठाणे, नवी मुंबई व मुंबईत १४ तर आरोपी रोहित नागवेकर याच्यावर ९ गुन्हे दाखल असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहेत. त्याने साथीदाराचीही माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रोहित नागवेकर याला ताब्यात घेतले . या दोघांनी मुंबईतील वडाळा टी. टी., नेहरू नगर, पुण्यातील तळेगाव दाभाडे व ठाणे जिल्ह्यातील आसनगाव येथे अनेकांना लोनचे आमिष दाखवून पैसे उकळल्याची कबुली दिली. या आरोपींना पुढील तपासासाठी वडाळा टी. टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.