(नवी दिल्ली)
देशातील काही मोठ्या बँकांनी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) वाढवली आहे. अशा परिस्थितीत आता बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड (EMI) करणं महाग होणार असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. देशातील दोन सरकारी आणि एका खासगी क्षेत्रातील बँकेने व्याजदर वाढवले आहे.
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR हा किमान दर आहे. ज्याच्या खाली कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया या दोन सरकारी बँकांनी आणि आयसीआयसीआय या खासगी बँकेने व्याजदर वाढले आहे, त्यामुळे आता या तीन मोठ्या बँकांकडून आता कर्ज घेणं महाग होणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ऑगस्ट महिन्यासाठी एमएलसीआर दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र पीएनबी बँकेच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट रेट 8.10 टक्के आहे. आता यात वाढ होताना एक महिन्याचा एमएलसीआर दर 8.20 टक्के आहे. पीएनबीमध्ये तीन महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.30 टक्के आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.50 टक्के झाला आहे. याशिवाय एका वर्षासाठीचा एमएलसीआर आता 8.60 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.90 टक्के करण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडियानेही (BOI) आपल्या एमएलसीआर दरात बदल करताना निवडक मुदतीवरील दर वाढवले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट रेट 7.95 टक्के होता, मात्र आता एका महिन्याचा एमएलसीआर दर 8.15 टक्के आहे. तसेच तीन महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.30 टक्के आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.50 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय एका वर्षासाठी एमएलसीआर आता 8.70 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.90 टक्के झाला आहे.
आयसीआयसीआय (ICICI) बँकेने सर्व कालावधीसाठी एमएलसीआर 5 बीपीएसनं वाढवला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, एका महिन्याचा एमएलसीआर दर 8.35 टक्क्यांवरून आता 8.40 टक्के झाला आहे. आयसीआयसीआय बँकेचा तीन महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.45 टक्के आणि सहा महिन्यांसाठी एमएलसीआर दर 8.80 टक्के झाला आहे. याशिवाय एक वर्षाचा एमएलसीआर 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के करण्यात आला आहे.