( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरीमध्ये एका टँकर मधून चक्क सुमारे २ हजार किलोचा गॅसच चोरीला गेला आहे. ही घटना तालुक्यातील करबुडे येथे घडली. येथील न्यू शांती हॉटेलच्या मागे असलेल्या शेडमधील टँकरमधून १ हजार ९०२ किलो वजनाचा गॅस चोरीस गेलाय.
याप्रकरणी चार संशयितांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १.३० वा.घडली.
याबाबत शुभांग बिजेंद्रपाल सिंग (३८,रा.पिर्यामिड सिटी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, शुभांग सिंग हे कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड ४०४ या कंपनीतमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर काम करतात. ते या कंपनीचा संपूर्ण भारतातील व्यवसाय पाहतात. या कंपनीतील गॅस जहाजव्दारे जयगड पोर्ट जेटीवर येउन तिथून पाईपव्दारे तो गॅस टँकरमध्ये लोड केला जातो.त्यानंतर जयगड पोर्ट जेटी ते कर्नाटक बेळगाव असा पाठवला जातो. अशाच प्रकारे टँकर (एमएच-१७-टी-६८८१) या टँकरमधून गॅस बेळगावला पाठवला जात होता. हा टँकर न्यू शांती हॉटेलच्या मागे उभा असताना चार संशयितांनी टँकरमध्ये मशिन फिट करुन त्याला असलेल्या ७ नोजलला बीपीसीएल व एचपीसीएल कंपनीचे कमर्शियल गॅस सिलेंडर जोडून एकूण १ हजार ९०२ किलो वजनाचा गॅस चोरला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.