[ नवी दिल्ली ]
कम्युनिस्ट पक्ष भारतासह संपूर्ण जगातून नामशेष होत चालला आहे. काँग्रेसची वाटचालदेखील त्याच दिशेने सुरू आहे. त्यामुळे भाजप हाच देशाचे भविष्य असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळमध्ये केले आहे.
एससी-एसटी मोर्चासमोर शनिवारी बोलताना शहा यांनी केरळी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील भाजपमध्ये सामील होण्याची साद घातली.
ते म्हणाले, जेव्हा पुलवामा घडले तेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून तिथल्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. काँग्रेसने अशी हिंमत कधीच दाखवली नव्हती. मोदींच्या धडाकेबाज नेतृत्वामुळेच हे शक्य झाले.
भाजप हा देशातील सर्वसमावेशक पक्ष आहे. आम्ही सर्वच घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांच्या पंखांत बळ भरण्यासाठी भाजपने नेहमीच पाठिंबा दिला आहे.ओडिशातील एका छोट्या गावातील द्रौपदी मुर्मू यांना देशातील सर्वोच्चपदी विराजमान होण्याची संधी लाभली हे याचे उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे.काँग्रेसने गरिबांचे नाव घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरल्या. भाजपने मात्र तळागाळातील जनतेपर्यंत विकास पोहोचवला, असेही शहा यांनी स्पष्ट केले.