जिल्ह्यातील कोरोना अपडेटमध्ये मृत्यूची योग्य नोंद केली नव्हती. यामुळे उपचारासाठी मिळणाऱ्या रेमडेसिवीर व इतर औषधांचा साठा आवश्यक प्रमाणात येत नव्हता. यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी तीन ते चार अधिकाऱ्यांची समिती नेमून बाधितांवर उपचारासाठी आवश्यक नियोजन करण्याची मागणी माजी आमदार व भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केली. उदाहरण द्यायचे तर जिल्ह्याच्या कोरोना अहवालामध्ये २४ एप्रिल रोजी मृत्यू झालेले कोरोना रुग्ण १७ आहेत.
तर यापूर्वीचे मृत्यू झालेले ६ अशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे मृत्यू २० पासून २२ तारखेपर्यंत व यापैकी काही मृत्यू शासकीय रुग्णालयामध्ये झालेले आहेत. परंतु, वेळेवर मृत्यूची नोंद केली नसल्याने मृतांची संख्या कमी असल्याची तफावत दिसून येते. ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे की, जिल्हा रुग्णालयाची हे निश्चित होण्याची आवश्यकता आहे. मृतांची संख्या कमी दाखवल्यामुळे जिल्ह्याला मिळणारा रेमडेसिवीरचा व इतर औषधांचा साठा यामध्ये तफावत आढळून येते.
यामुळे जिल्ह्यातील या सर्व कामकाजासाठी समिती नियुक्त करून आरोग्य व्यवस्थेचे काम कोणा एका अधिकाऱ्यावर न ठेवता तीन ते चार अधिकाऱ्यांच्या समितीने करण्याची मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.