(रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील गावखडी गुरववाडी येथे कपाऊंडच्या वादातून तरूणावर कोयत्याने वार करणाऱ्याला न्यायालयाने दोषी मानून शिक्षा सुनावली. सुरेश केशव गुरव (रा. गावखडी गुरववाडी) असे आरोपीचे नाव आहे. नुकसान भरपाई म्हणून ७ हजार रूपयांचा दंड व एक वर्षाच्या चांगल्या वर्तवणूकीबाबत १५ हजार रूपयांच्या बंधपत्रावर न्यायालयाने आरोपीची मुक्तता केली.
रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून अॅड. विद्यानंद जोग यांनी काम पाहिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावखडी येथील अरूण धनाजी गुरव व आरोपी सुरेश गुरव यांच्यात घराच्या कंपाऊंडवरून वाद सुरू होता. १२ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ८ च्या सुमारास अरूण गुरव हे गुरववाडी बसस्टॉप येथे उभे होते. यावेळी सुरेश गुरव याने मागील वाद मनात ठेवून अरूण गुरव याच्यावर कोयत्याने वार केला, असा आरोप सुरेश गुरव याच्यावर ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी अरूण गुरव यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी सुरेश गुरव याच्याविरूद्ध भादंवि कलम ३२३, ३२४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपपत्र ठेवले. न्यायालयाने सुरेश गुरव याला १५ हजार रूपयांच्या बंधपत्रावर मुक्तता केली. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून पूर्णगड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश मुरकर यांनी काम पाहिले.