( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ते कडवई या रस्त्याची भयानक दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे वाहनचालक व प्रवाशी यांच्यासाठी त्रासदायक झाले आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेला सार्वजनिक बांधकाम खातेच जबाबदार असल्याचा आरोप रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केला आहे. नव्वद लाख रुपये खर्च करून सन २०१९ साली हा अडीच किलोमीटरचा रस्ता करण्यात आला होता. या रस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याचे बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष झाल्याने आज ही अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
तुरळ कडवई रस्ता हा फार मोठ्या वर्दळीचा रस्ता. सन २०१९ साली रिक्षा संघटनेच्या आंदोलनाची दखल घेत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम रुमाना कन्स्ट्रुक्शनच्या जाहिद खान या ठेकेदारास देण्यात आले. याला त्याचवेळी विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र ऑनलाइन प्रक्रियेचे कारण सांगत याला बगल देण्यात आली.
रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही बाब वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. रस्त्याचे अंदाजपत्रकाप्रमाणे बीबीएम न करताच हे काम उरकण्यात आले. तसेच अंदाजपत्रकात साइडपट्टीची तरतूद असताना ती केली गेली नाही. या सर्व बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता यांच्या समक्ष निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराला पाठीशी घालत हे काम उरकण्यात आले.
केवळ चार महिन्यातच हा रस्ता खराब होण्यास सुरुवात झाली. या विरोधात रिक्षासंघटनेने आवाज उठवल्यानंतर खड्डे भरण्याचे नाटक करण्यात आले. ते भरलेले खड्डेही महिनाभरात उखडले. यानंतर सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे व रस्ता पूर्ववत करून मिळावा या आशयाचे लेखी निवेदन रिक्षा संघटनेच्यावतीने बांधकाम विभागाला देण्यात आले. तसेच अशा आशयाचा ठराव कडवई ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आला व तसे बांधकाम विभागास कळवण्यात आले. मात्र आजतागायत अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते.
सध्या या रस्त्याची अवस्था फार बिकट झाली असून गर्भवती महिला, तसेच इतर रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. वाहनांचे फार मोठे नुकसान होत आह. तर अनेकवेळा अपघातही घडून येत आहेत. यामुळे वाहनचालक तसेच ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता ठेकेदाराचा देखभाल दुरुस्ती कालावधी संपला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखलीच्या वतीने उग्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे.