( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित साहेब यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांच्या सोबत सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत कांबळे,पोलीस हवालदार सचिन कामेरकर,५८ बटालियन सिंधुदुर्ग (ओरोस)चे एन.सी.सी.पी.आय. युनिटचे मेहबूब सर व सतिश पवार, संस्था समन्वय समिती सदस्य जितेंद्र चव्हाण, मुज्फर अली खान हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘ विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या मायारुपी जाळ्यातून बाहेर पडून मैदानी खेळाकडे वळावे’ असे सांगितले.खेळाच्या माध्यमातून आपले स्वास्थ्य चांगले ठेऊन खेळातून करीयर कसे करता येईल याचा विचार करावा, असे ते पुढे म्हणाले.
उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटनाचा सामना इयत्ता पाचवी व सहावी अ यांच्यात कबड्डीचा खेळविण्यात आला. क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी,खो-खो,लंगडी, हॉलीबॉल,रस्सीखेच हे सांघिक खेळ तर धावणे,उंच उडी,गोळा फेक, थाळी फेक या वैयक्तिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे.दिवसभर चालणाऱ्या स्पर्धांना अनेक मान्यवर व माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून खेळाडूंना खाऊ देण्यात आला.यावेळी मारुती ब्रीद,ज्योती ब्रीद आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
खेळाचा आनंद घेत व्यक्तिमत्व घडवावे
जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी देखील उपस्थिती लावून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.प्रशालेचे माजी विद्यार्थी व दलवाई हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सागितले की, याच शाळेतून माझी जडणघडण झाली.क्रिकेट व कबड्डी या खेळांच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व विकसित झाले. खेळांमुळे आज माझे आरोग्य उत्तम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळांचा आनंद घेत आपले व्यक्तिमत्व घडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक शेषेराव अवघडे व पर्यवेक्षक संतोष साळुंके यांच्या हस्ते पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार व मिलिंद कडवईकर यांनी केले. दुपारी विद्यार्थ्यांसाठी अंताक्षरी व फनी गेम्स आयोजित करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर गीते सादर केली.यावेळी सौजन्या महाडिक, प्रदीप कानाल, मिलिंद कडवईकर, शशिकांत किंजळकर, शुभम शिंदे, सिध्दी सुर्वे, सूरज कदम, भाग्यदेवी चौगुले यांनी कविता, अभंग व भावगीते सादर केली. तर आशिष मोकादम यांनी कोकणी बोलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
या स्पर्धेसाठी मुज्फर अली खान दरवर्षी मैदानासाठी जागा उपलब्ध करून देतात. हा महोत्सव गुरुवारी सुरू झाला असून शनिवार पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांनी आपली काळजी घेत स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय घोसाळकर, राजेश खेडेकर, प्रशांत साळवी, अरविंद सुर्वे व एन.सी.सी.कॅडेट मेहनत घेत आहेत.