( संगमेश्वर/प्रतिनिधी )
तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवई येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर विविध व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर निवडणे सोपे जावे,तसेच अभ्यासाचा ताण निर्माण होऊ नये या दृष्टीने व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख मिलिंद कडवईकर यांनी व्यवसाय मार्गदर्शनाचे महत्व स्पष्ट केले.प्रथम सत्रात समुपदेशक रवींद्र खानविलकर यांनी इयत्ता दहावी – बारावीनंतर करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले.ध्येयनिश्चिती वेळेत केली तर आपल्याला लवकर यश मिळू शकते.त्याचबरोबर अभ्यास करताना स्वतःची मानसिकता कशी टिकवावी यासाठी त्यांनी काही ताण दूर करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगितल्या.निवृत्त प्राचार्य हरिभाऊ पाथोडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन सांगितले की खरे विज्ञान प्रयोगाने समजते.आपल्या संतांच्या शिकवणुकीत विज्ञान सामावलेले आहे.पण आजकालचे बाबा बुवा विज्ञानाच्या मदतीने सामान्य जनतेची कशी फसवणूक करतात हे सप्रयोग दाखवून दिले.यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विलास डिके उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात औद्योगिक प्रशिक्षण संस्था,संगमेश्वरचे प्राध्यापक विजय गिरकर यांनी आय. टी.आय.ची प्रवेश प्रक्रिया,त्यामधील विविध कोर्सेस,त्यातून भविष्यकाळातील संधी, डिप्लोमा करायला संधी या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की आय.टी.आय.करून फक्त नोकरी नाही तर अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून यश संपादन केले आहे. प्रा.संदेश पालये यांनी आर्ट एज्युकेशन अँड क्रिएटिव्ह करीयर या विषयावर मार्गदर्शन करताना एखाद्या शब्दाच्या माध्यमातून देखील कश्या पद्धतीने जाहिरात केली जाते व हजारो रुपये मिळविले जातात ते समजावले. फाईन आर्टच्या माध्यमातून कमी कालावधीत करीयर कसे करता येते हे त्यांनी त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या उदाहरणावरून सांगितले.चित्रपट,जाहिरात, ऍनिमेशन, फोटोग्राफीच्या माध्यमातून विद्यार्थी कसे यशस्वी होतात हे त्यांनी पी.पी. टी. च्या सहाय्याने दाखविले.
तिसऱ्या सत्रात पी.एस.आय.शंकर नागरगोजे यांनी मार्गदर्शन करताना सागितले की कष्ट करण्याची तयारी ठेवा संधी तुमची वाट पाहत आहे.कोणतीही व्यक्ती एका प्रयत्नात यशस्वी होत नाही यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करा.सोशल मीडियाचा जपून वापर करून यश संपादन करा.आज पोलीस खात्यात देखील विविध प्रकारच्या संधी असून त्याचा लाभ अनेक शाखातील पदवीधारक विद्यार्थी घेत आहेत.सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले की मी बॅकबेंचर विद्यार्थी होतो.विद्यार्थी दशेत अनेक चुका झाल्या पण शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनमुळे यशस्वी होता आले.आपले पालक आपल्यासाठी काय करतात याची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने वागले पाहिजे तर यश दूर नाही.पोलीस हवालदार सचिन कामेरकर म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्याने अष्टपैलू असले पाहिजे.अपयशाने न खचता पुढे कसे जाता येईल याचा विचार केला पाहिजे.
यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक शेषेराव अवघडे व पर्यवेक्षक संतोष साळुंके यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर भालेकर, शशिकांत किंजळकर,सूरज कदम,सोमनाथ कोष्टी,नयना राजेशिर्के,अरविंद सुर्वे व प्रशांत साळवी यांनी मेहनत घेतली.