(छ. संभाजी नगर)
औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्याबाबत सातत्याने पोस्ट टाकून महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचे मोठे षड्यंत्र सुरू आहे. कोल्हापूर, नगर आणि अमरावतीत गेल्या आठवड्यात दंगली आणि तणाव निर्माण केल्यानंतर आता अताऊर रेहमान पटेल या तरुणाने औरंगजेबाचा राज्याभिषेक दिन 13 जूनला जल्लोषात साजरा करा, अशी पोस्ट टाकल्याने पुन्हा वातावरण ढवळून निघाले. अशा वरचेवर होणाऱ्या घटनांमुळे आगामी काळात मोठी दंगल घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात राहणारा अताऊर रेहमान पटेल याने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 13 जून 1659 रोजी औरंगजेबाचा राज्याभिषेक झाला होता. याला 364 वर्षे झाली असून येत्या मंगळवारी 13 जून रोजी औरंगजेबाच्या राज्याभिषेकाचा वर्धापन दिन सर्वांनी धुमधडाक्यात साजरा करावा. ही पोस्ट व्हायरल झाल्याने तणाव वाढला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत स्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील वलगावमध्ये एका व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवले होते. दुसर्या गटाने त्याच्याविरोधात वलगाव पोलीस ठाण्यामध्ये दुपारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी स्टेट्स ठेवणार्या व्यक्तीची चौकशी सुरू केली. त्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांच्या विनंतीनंतर आक्षेपार्ह स्टेट्स डिलीट केले. मात्र, ही बातमी पसरल्यामुळे रात्री उशिरा वलगावच्या मुख्य चौकात आणि बाजारपेठ परिसरात अडीचशे ते तीनशे लोक समोरासमोर उभे ठाकले. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अधिकार्यांनी समजूत काढल्यानंतर तणाव निवळून जनजीवन सुरळीत झाले. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना आवाहन केले की, सोशल मीडियावर कुठल्याही समाजाच्या भावना दुखावतील, असे मेसेज किंवा स्टेट्स ठेवू नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काही तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे एका दर्ग्याच्या संदल उरुस दरम्यान निघालेल्या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. यातील एक फोटो मिरजगावच्या आसिम पठाण या तरुणाने समाजमाध्यमावर पोस्ट केला. यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. या घटनेच्या निषेधार्थ मिरजगावमधील काही हिंदुत्ववादी संघटनांनी गुरुवारी 8 जून रोजी मिरजगाव बंदचे आवाहन केले होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावेळी मिरजगाव पोलिसांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून आसिम पठाणविरोधात हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करणार्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी मिरजगाव बंद मागे घेतला.
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीनंतर सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्या. आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देताना कुठल्याही जातीच्या, धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, याची ताकीद त्यांना द्या, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील मशिदींमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे प्रबोधन मुस्लीम बोर्डिंग, शांतता समिती, जिल्हा बैतुलमाल कमिटी आणि जमियत उलेमा-ए-हिंद या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशेहून अधिक मशिदीत झाले. आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार आहोत. त्यामुळे हा विचार अधिक नेटाने पुढे नेताना सर्व धर्मांचा आदर राखणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. या विचारांना तडा जाईल, असे कुठलेही कृत्य आपल्याकडून होता कामा नये. कोल्हापूर पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. म्हणूनच येथे सर्व जातीचे, धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात; पण एखाद्या समाजकंटकाकडून सोशल मीडियावरून काहीतरी चुकीची माहिती पसरवली जाते आणि त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात, असे मुस्लीन बोर्डाने घेतलेल्या प्रबोधनात सांगण्यात आले आहे.
अहमदनगर येथे औरंगजेबाचे पोस्टर झळकवणार्यांवर कठोर कारवाई करावी, लव्ह जिहाद तसेच धर्मांतरविरोधी कायदा करण्यात यावा या मागणीसाठीभिंगार येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने ही बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगरमधील भिंगारमध्येच औरंगजेबाचा शेवट झाला होता. औरंगजेबाने आपल्या आयुष्याचे शेवटचे 13 महिने या भिंगार गावात घालवले होते. औरंगजेबाला शेवटची आंघोळ ज्या चौथर्यावर घालण्यात आली होती, तो चौथरा भिंगारमध्ये आहे. तो उखडून फेकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्याने बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या आणि पोलिसांची एक तुकडी इथे तैनात करण्यात आल्या होत्या. बंद शांततेत पार पाडावा आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली.