(चिपळूण / ओंकार रेळेकर)
ओवळी गावात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ चालू असून, गावात सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. संध्याकाळ होताच रानातून बिबट्या शिकारीच्या शोधात गावातील वाड्यांमध्ये शिरकाव करू लागतो. बिबट्याने आतापर्यंत रानात व गोठ्यात मिळून सात जनावरांचा फडशा पाडला आहे. तसेच काही कुत्र्यांची सुद्धा शिकार केली आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे जंगलातील प्राणीही पाठ फिरवू लागले आहेत. भर पावसाळ्यात सुद्धा जंगलतोड चालू आहे. तुटपुंज्या द्रव्यासाठी गावकरी आपली मालकी राने व्यापाऱ्यांना विकत आहेत. तसेच जमिनी सुद्धा परप्रांतीय लोकांना विकू लागले आहेत.
चिपळूण शहरातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी गावाला लाभलेल्या सुंदर निसर्गाचे अस्तित्व टिकवण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे. मालकी जंगले जपणे गावचे हिताचे असून त्या जंगलांचा ऱ्हास केल्यास आगामी काळात मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. भूस्खलन व महापुरासारखी संकटे ओढवून घेण्यासारखे असून, याचा परिणाम चिपळूण शहरावरही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
चिपळूण शहरांमधील पर्यावरणवादी संघटना चांगले काम करित असल्या तरी, पुढे येउन सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यातील गावांमधून विशेष लक्ष घालून गावातील लोकांना निसर्गाचे महत्व पटवून देऊन “सह्याद्री वाचवा” मोहिमे अन्तर्गत लोकांमध्ये जागृती करण्याचे काम करण्याची अत्यंत गरज आहे. जंगलतोडीमुळे व चोरट्या शिकारीमुळे या परिसरातील पशु-पक्षी जीवन धोक्यात आले आहे. सांभर, भेकर, ससे, यांसारख्या प्राण्यांच्या संख्येत घट झाली असल्याने, बिबट्या गावात शिरून गुरे व कुत्र्यांची शिकार करू लागला आहेत.
निसर्गाचे सन्तुलन बिघडल्यानेच हिंस्त्र प्राणी मनुष्य वस्तीत शिरकाव करू लागतात. भक्ष्य न मिळाल्यास मनुष्य प्राण्यावरही हल्ला करण्यास कचरत नाहीत. दसपटीच्या खोऱ्यातील बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. याबाबत पक्षीमित्र दीपक शिंदे यांनी व यासह अनेक निसर्गप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.