(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम.आकांक्षा सुधीर देसाई यांनी आपल्या सरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांचा राजीनामा रितसर मंजूर झाला आहे. त्यामुळे ओरी गावाचे सरपंचपद रिक्त झाले असून या सरपंच पदावर उपसरपंच म्हणून कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते संकेत उर्फ बंड्या देसाई यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ओरी गावात गेल्या अडीच वर्षात सरपंच आकांक्षा सुधीर देसाई तसेच उपसरपंच संकेत देसाई आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून ओरी गावात अनेक प्रकारची विकास कामे अतिशय चांगल्या प्रकारे मार्गी लागली आहेत.
महिला सरपंच आकांक्षा देसाई यांनी गावातील अपेक्षित अनेक विकासकामांना अधिक गती देऊन सरपंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे अंगणवाडी इमारत, शाळा दुरूस्ती, नवीन रस्ते, रस्ते दुरुस्ती,रस्ते डांबरीकरण, स्मशानभूमीची शेड उभारणी, संरक्षण भिंत, नळपाणी योजना अशा अनेक विकासकामांसाठी विविध प्रकारच्या योजनांमधून ओरी गावात सुमारे १२ कोटींची विकासकामे मार्गी लागली आहेत. गावातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ओरी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.