ओडिशा रेल्वे अपघातातील मृतदेह ठेवण्यात आलेली शाळेची इमारत पाडण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षक या शाळेत जाण्यास घाबरत होते. यामुळे प्रशासनाने ही शाळा पाडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या ठिकाणी नवीन इमारत बांधली जाईल. नव्या इमारतीच्या पुजेनंतर शिक्षण सुरु होणार आहे.
ओडिशातील बालासोर येथे २ जून २०२३ रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, हजरांहून अधिक जण जखमी झाले होते. घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बहंगा हायस्कूलमध्ये मृतदेह ठेवण्यात आले. बचाव पथकाने ६५ वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीच्या दोन खोल्या आणि हॉलचे रूपांतर तात्पुरत्या शवागारात केले होते. या ठिकाणी कफनात गुंडाळलेले मृतदेह आणण्यात आले होते. ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्याने या शाळेत जाण्यास नकार दिला. यामुळे प्रशासनाने ही शाळा पाडून या ठिकाणी नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
#WATCH | Odisha | Parts of Bahanaga school building in Balasore are being razed. This comes after the parents expressed their reluctance in sending their children to school after it was turned into a temporary mortuary for the deceased of #BalasoreTrainAccident
A teacher says,… pic.twitter.com/dm4zt5mHwZ
— ANI (@ANI) June 9, 2023
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला स्वेन म्हणाल्या की, या शाळेत ६५० विद्यार्थी शिकत आहेत. परंतु, या शाळेत मृतदेह ठेवल्याने लहान मुले व शिक्षकही घाबरत आहेत. इमारत पूर्ण झाल्यानंतर, शाळेने आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची आणि त्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी काही विधी आयोजित करण्याची योजना आखली आहे. तर व्यवस्थापन समितीने सांगितले, की इमारत जुनी झाल्याने असुरक्षित झाली होती. तसेच रेल्वे अपघातातील मृतदेह ठेवल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नव्हते. पालकांनीही ही इमारत पाडण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही शाळा पाडण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही गुरुवारी पुनर्बाधणीला मंजुरी दिली आहे.