(बालासोर)
ओडिशाच्या बालासोर जवळील बहानग बजार येथे झालेल्या ट्रेनच्या अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या १०१ मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटलेली नाही. तर आतापर्यंत ५५ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. २ जून रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास तीन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या महाभीषण अपघातात ३०० प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे गाड्यांच्या आघाताची तीव्रता एवढी होती की, कित्येक प्रवासी डब्यांच्या खिडक्या फोडून बाहेर फेकले गेले.
या दुर्घटनेत १,०००हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही आतापर्यंतची सर्वात भीषण रेल्वे दुर्घटना आहे. बालासोर, कटक आणि आसपासच्या शहरांतील रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, अजूनही १०१ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय म्हणाले, ‘या अपघातात सुमारे १,१०० प्रवासी जखमी झाले होते, त्यापैकी सुमारे ९०० जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर सुमारे २०० जणांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७८ जणांपैकी १०१ मृतांची ओळख पटलेली नाही.’
अपघाताला चार दिवस उलटल्यानंतरही भुवनेश्वर एम्सच्या शवागाराबाहेर मृतांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी दिसत आहे. अगोदरच दु:खाचा डोंगर कोसळला असताना अनेक तास उलटूनही आपल्या आप्तांचे मृतदेह मिळत नसल्याने मृतांचे नातेवाईक वैफल्यग्रस्त झाले आहेत. एम्समधील शवागाराच्या बाहेर एका स्क्रीनवर मृतदेहांचे फोटो दाखवले जात आहेत. यामध्ये आपल्या घरातील व्यक्तीचा फोटो आहे का, हे पाहण्यासाठी मृतांचे नातेवाईक या स्क्रीनला खिळून बसलेले आहेत. परंतु, अनेक तास टक लावून पाहिल्यानंतरही यापैकी अनेकांच्या पदरी निराशाच पडत आहे. या भीषण अपघातात अनेक मृतदेहांची अवस्था ओळख पटवण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला शेवटचं तरी पाहता येईल की नाही, याबाबतची आशा तासागणिक धुसर होत चालली आहे.
हि धडक एवढी जोरदार होती कि यामुळे ट्रेनमधील अनेकांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी अनेक मृतदेहांचे हातपाय धडावेगळे झाले आहेत, अनेकांचे अवयव आणि चेहरे छिन्नविछिन्न झाले आहेत. या अपघातावेळी उच्च दाबाचा विद्युतप्रवाह असलेली ओव्हरहेड वायर खाली आली. त्यामुळे जवळपास ४० प्रवाशांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. तर या ४० जणांचा मृत्यू झाल्यानंतरही बराच काळ त्यांच्या शरीरातून विद्युतप्रवाह वाहत राहिला. त्यामुळे या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झालेला आहे. परिणामी या मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना १०१ प्रेतांच्या गर्दीतून त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कशी शोधून द्यायची, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. यावर उपाय म्हणून आता रुग्णालय प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने गोळा करायला सुरुवात केली आहे. त्याच्याआधारे मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन ओळख पटवण्याचे काम सुरु झाले आहे.