(रत्नागिरी)
रत्नागिरीच्या समुद्रामध्ये तेलाचे साठे सापडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असून यासंदर्भातील कामही सुरु झालं आहे. स्थानिक मच्छीमारांसाठी जारी करण्यात आलेल्या एका पत्रामुळे खरोखरच अशी मोहिम राबवली जात असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यापासून 40 नॉटिकल मैलांवर ओएनजीसी कंपनीमार्फत तेलाचे साठे शोधण्यासाठी भूकंपीय सर्वेक्षण (सिझमिक सर्व्हे) करण्यात येत आहे. याच सर्वेक्षणासाठी एक मोठे जहाज फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जयगड ते रायगड दरम्यानच्या समुद्रामध्ये फिरणार आहे. हा सर्व्हे सुरू असताना दुर्घटना टाळण्यासाठी मच्छीमारांना विशेष सल्ला देण्यात आला आहे. मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षा बाळगावी किंवा जहाजाच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन मत्स्य विभागाकडून केले आहे. याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सोसायट्यांना पाठवण्यात आले आहे.
हा सर्व्हे समुद्रात ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणाचा नकाशा तसेच अक्षांश व रेखांशची माहितीही मच्छीमारांना कळवण्यात आली आहे. ओएनजीसी कंपनीमार्फत समुद्रात फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत तेल संशोधन करण्यात येत आहे. त्यासाठी भूकंप संशोधन जहाज जयगड ते रायगडपासून 40 नॉटिकल मैलांवर दाखल झाले आहे. हे सर्वेक्षण क्षेत्र किनाऱ्यापासून लांब असून, दाभोळपासून खोल समुद्रात 75 किमी अंतरावर आहे.
जहाजावरील विविध यंत्रणांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे जहाज 4 ते 4.5 नॉट्स वेगाने 24 तास सतत समुद्रात सक्रीय राहणार आहे. या जहाजाच्या मागे 6 हजार मीटर लांबीच्या (6 किलोमीटर) 10 केबल्स लावण्यात आल्या आहेत. स्ट्रीमर्सची खोली 6 मीटर आणि शेपटीच्या दिशेने 30 मीटरपर्यंत असेल. हा भाग पाण्याखाली असेल असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक 6 हजार मीटर लांबीच्या केबलच्या शेवटी फ्लॅशिंग लाइटसह एक टेल-बॉय असेल. ही बोट न थांबता चालवण्यात येणार असून, ती लगेच वळवता येत नाही. अपघात टाळण्यासाठी मच्छीमारांनी नौका व जाळी भूकंपीय जहाज आणि बाहेरील उपकरणाच्या मार्गापासून दूर राहावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
या मोठ्या जहाजाबरोबर दुसरे एक छोटे जहाज (सॅन्को स्काय) आणि 3 सुरक्षा व्हेसल्स (मॅट युरेनस, एनाक्षी, सोहा) या परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण करत असताना समुद्रात मासेमारी नौकांच्या हालचालींचं प्रत्येकी दोन समन्वयक आणि दुभाष्यांद्वारे 24 तास निरीक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कंपनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मासेमारीसाठी जात असताना मच्छीमारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा सर्व्हे जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्याचा कंपनीचा तसेच स्थानिक प्रशासनाचा प्रयत्न आहे.
ओएनजीसी कंपनीकडून समुद्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी जहाज दाखल होत आहे. सर्वेक्षण करत असताना मच्छीमारांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात मच्छीमार सोसायटींना पत्र पाठवण्यात आले आहे.