एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 24 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा तब्बल 309 धावांनी पराभव करून विक्रमी विजय मिळवला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर कांगारूंचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा 5 सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. डच संघाने द. आफ्रिकेविरुद्धचा एकमेव सामना जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा स्वतःचाच विक्रम मोडला. 2015 मध्ये पर्थमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 275 धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारताच्या नावावर आहे. 2023 मध्ये तिरुअनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध 317 धावांनी विजय मिळवला होता.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी बाद 399 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 21 षटकांत 90 धावांत गारद झाला.
मॅक्सवेलचे विक्रमी शतक..
मॅक्सवेलने नेदरलँड्स विरूध्द शेवटच्या षटकांमध्ये तुफानी खेळी खेळली आणि अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. मॅक्सवेलने या सामन्यात 44 चेंडूत 106 धावा केल्या. यादरम्यान मॅक्सवेलने 9 चौकार आणि 8 षटकार ठोकले. म्हणजेच मॅक्सवेलने केवळ चौकार आणि षटकारांसह 84 धावा केल्या. स्फोटक पद्धतीने खेळणाऱ्या कांगारू फलंदाजाने अवघ्या 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर मॅक्सवेलने खऱ्या अर्थाने आपली ताकद दाखवून दिली आणि पुढच्या 13 चेंडूत पुढचे अर्धशतक झळकावले. ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत अॅडम मार्करामला मागे टाकले आहे. मार्करामने या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना 49 चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केविन ओब्रायनचे नाव आहे, ज्याने 50 चेंडूत ही कामगिरी केली. त्याचबरोबर मॅक्सवेलने 2015 च्या विश्वचषकात 51 चेंडूत शतक झळकावले होते.
वॉर्नर आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने 71 आणि मार्नस लॅबुशेनने 62 धावा केल्या. जोश इंग्लिशने 14 आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद 12 धावा केल्या. मिचेल मार्श नऊ धावा करून आणि कॅमेरून ग्रीन आठ धावा करून बाद झाले. मिचेल स्टार्क खातेही उघडू शकला नाही. एडन झाम्पाने एक धाव केली.
नेदरलँड्सकडून गोलंदाजीत लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बास डी लीडेला दोन विकेट घेण्यात यश मिळालं. आर्यन दत्तने एक विकेट घेतली.
Australia register the largest victory by runs in the history of the @cricketworldcup 🙌#AUSvNED | #CWC23 | 📝: https://t.co/0yVJkpO6XJ pic.twitter.com/aV6jXH68Qk
— ICC (@ICC) October 25, 2023