(नवी दिल्ली)
आता लवकरच ऑनलाईन गेमिंग वर २८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. शुक्रवारी संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जीएसटी आणि आयजीएसटी संशोधन विधेयक मंजूर झाले आहे. यामुळे आता ऑनलाईन गेमिंग, कसीनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के जीएसटी लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संसदेत जीएसटी आणि आयजीएसटी संशोधन विधेयक पारीत झाले आहे.
जीएसटी काऊन्सिलकडून २ ऑगस्ट रोजी कायद्यात बदल करण्याची शिफारस केली आहे. या कायद्याला आधीच कॅबिनेटकडून मंजूरी मिळाली होती. लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आणि तेथेही याला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्याआधी हे विधेयक लोकसभेत सादर केले होते., तेथेही याला आधीच मंजुरी मिळाली आहे.
कसिनो, हॉर्स रेसिंगवरही २८ टक्के
जीएसटी काऊन्सिल ने २ ऑगस्ट रोजी ५१ व्या बैठकीत सीजीएसटी कायदा, २०१७ च्या शेड्यूल ३ मध्ये कसिनो, हॉर्स रेसिंग आणि ऑनलाइन गेमिंगमधील पुरवठ्यावर कर आकारणी स्पष्ट करण्यासाठी सुधारणा करण्याची शिफारस केली होती. ही सुधारणा म्हणजे ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन मनी गेमिंग, ऑनलाइन गेमसाठी पैसे देण्यासाठी वापरलेली डिजिटल मनी आणि ऑनलाइन गेमिंगच्या बाबतीत पुरवठादार यांच्यावरील जीएसटी संबंधित स्पष्ट नियम आहे. जीएसटी कायद्यातील सुधारित तरतुदी १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. जीएसटी नियम लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर त्याचा आढावा घेतला जाईल असे जीएसटी काऊन्सिलने म्हटले आहे.
संसदेत सुधारणा विधेयक मंजूर
लोकसभेत शुक्रवारी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ मंजूर करण्यात आले आहे. याद्वारे, जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर कायद्यांमध्ये ऑनलाइन गेमिंग, कसिनो आणि हॉर्स रेसिंग क्लबमध्ये खेळल्या जाणा-या संपूर्ण रकमेवर २८ टक्के कर आकारण्यासाठी बदल प्रस्तावित केले आहेत. राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी वरील दोन्ही विधेयके संमत होण्यासाठी ठेवली आणि सभागृहाने ती चर्चेविना मंजूर केली. या वेळी अनेक विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. यापूर्वी लोकसभेने या विधेयकाला मंजुरी दिली होती.