(रत्नागिरी)
दिव्यांगत्वाच्या 21 प्रकारांमध्ये ऑटिझमचा देखील समावेश आहे. युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड वितरणाची प्रक्रिया जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून करण्यात येते. ऑटिझम अर्थात स्वमग्नतेची लक्षणे असणाऱ्या बालकांना मात्र ऑटिझमचे सर्टिफिकेट न मिळता त्यांना बौद्धिक अक्षम चे सर्टिफिकेट देण्यात येते. त्यामुळे या दिव्यांग बालकांच्या पूर्ण आयुष्याच्या पुनर्वसन प्रक्रियेची दिशा बदलून जाते. कारण अपंगत्वानुसार कोणत्या शैक्षणिक सवलती द्यायच्या हे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
मुलांचे प्रमाणपत्रानुसार पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक सवलती देण्याबद्दल सूचना प्राप्त आहेत. त्यामुळे दोन एप्रिल जागतिक स्वमग्नता जाणीव जागृती दिवसानिमित्त (ऑटिझम अवेरनेस डे) निमित्त आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या दिव्यांग वकालत केंद्राच्या वतीने संपदा कांबळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संगमित्रा फुले -गावडे यांना निवेदन दिले व लवकरात लवकर ऑटिझम (स्वमग्नता) चे लक्षणे असणाऱ्या बालकांना नियमानुसार ऑटिझमचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली. याप्रसंगी आस्थाच्या सुरेखा पाथरे देखील उपस्थित होत्या.