(मुंबई)
चाकरमान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन गणेशोत्सवासच्या तोंडावर म्हणजे दिनांक 11 सप्टेंबर या दिवशी एसटी बस कर्मचारी आंदोलन करणार असून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते संपावर जाण्याची शक्यता आहे. या संपामुळे मुंबई पुण्यावरून कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागणार आहे.
एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पगारवाढ, पदोन्नती अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी 11 सप्टेंबरला ही संपाची हाक दिली आहे. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहेत. जर सरकारने ऐकले नाही तर 13 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहेत मागण्या?
बैठकीत करारातील तरतुदीनुसार सरकारने 42% महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारामुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात
दहा वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा. एसटीची धाववेळ (रनिंग टाईम) निश्चित करावी.तसेच वाहकांचे (कंडक्टर) बदली धोरण रद्द करावे, खाजगी गाड्यांऐवजी स्वमालकीच्या नवीन बसेसचा पुरवठा त्वरीत करण्यात यावा. लिपिक- टंकलेखक पदाच्या बढतीसाठी 240 हजर दिवसांची अट रद्द करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास देण्यात यावा.अनेक विभागात 10-12 वर्षापासून कर्मचारी TTS आहेत त्यांना एकवेळची बाब म्हणून TS करण्यात यावे, जुल्मी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यातून चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जात असतो. एसटी महामंडळही मोठ्या प्रमाणात अतिरिक्त गाड्या सोडून प्रवाशांना सेवा देते. या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आणि या काळात एसटीला चांगला फायदा होतो. हीच गोष्ट हेरून संघटनेने त्याच वेळी संपाचे हत्यार पुन्हा उगारले आहे.